आपले मंडळ,आपली माणसं...
- Smita Chopade-Khatavkar

- Sep 8
- 2 min read
९/८/२०२५
सौ स्मिता चोपडे-खटावकर
:
अमेरिकेतील सेंटलुईस या शहरात राहून मला पंचवीस वर्षे होत आली. भारताकडे धाव घेणा-या माझ्या मनाला हे शहर नक्की केव्हापासून अगदी आपलेसे वाटायला लागले ते सांगता येणार नाही. पण हे जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्यामागे, या शहरातल्या लोकांचा, विशेषकरून मराठीमंडळाचा वाटा बराच मोठा आहे.
या 25 वर्षांच्या कालावधीत, मंडळात झालेली स्थित्यंतरे सातत्याने मंडळात जात असल्याने मला अनुभवता आली. इथल्या जुन्याजाणत्या लोकांकडून मंडळाच्या सुरवातीच्या काळातल्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. सर्वांनी मिळून केलेले गणपतीतले मराठमोळे जेवण, कोणाच्या घरातच भरणारी मराठी शाळा अशा आठवणी ऐकून लक्षात येते की पूर्वीच्या लोकांनी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष होऊ लागला आहे.
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मंडळाच्या कामकाजातही सुलभता आली आहे. वेगवेगळ्या उपक्रमांनाही सुरवात झाली आहे. पण या सगळ्यांमागचा एकसमान उद्देश, जो आधीही तोच होता आणि पुढेही तोच राहील, तो म्हणजे, आपले मराठीपण जपत एकत्र येणे,भेटणे, एकमेकांशी आपुलकीचे भावबंध जोडणे आणि नविन पिढीलाही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करणे. आनंदाची गोष्ट ही आहे की या उद्देशपूर्तीसाठी आपल्या या मराठी कुटूंबातील अनेकजण झटताना दिसतात. कोणी मंडळाचे कार्यकर्ते बनले आहेत, कोणी मराठी शाळा चालवत आहेत तर कोणी ढोलताशांची पथके चालवण्यासाठी मेहनत घेत आहेत.
या सर्वांमुळेच, हे आपले मराठी कुटूंब सेंटलुईस मध्ये अनेक वर्षे नांदते आहे. ते असेच एकत्र सुखासमाधानात राहो, हीच गणपतीबाप्पाकडे प्रार्थना 🙏

याच सर्व भावनांना गुंफून माझे मनोगत सांगणारी ही कविता,
कमानी वाल गाव
सेंटलुईस त्याच नाव
इथल्या सगळ्या माणसांना
गणपतीबाप्पा तू पाव
मंडळ आमच मराठी
लोकं इथली साधी
तुझेच स्मरण बाप्पा
सुरवात करण्याआधी
कुटूंब हे आपले,
करते महाराष्ट्राची आठवण
सारे मिळून करूया,
संस्कृतीची साठवण
मराठमोळ्या तालावरचे,
लेझीम इथे वाजावे
बॅडआॅर्केस्टाबरोबरच आपले,
ढोलताशेही गाजावे..
आमच्या मुलांना लागो
मायमराठीची गोडी....
मातृभाषेशी जोडली जावो
आपली पुढची पिढी...
मराठी शाळा मराठी सण
सारे त्याच्याचसाठी
झटते आहे मंडळ आपले
रहा त्याच्यापाठी
नवी विटी नवे राज्य
नवे कार्यकर्ते....
त्यांच्यामागे जरूर हवेत
जुने आणि जाणते...
नकोत क्लेश नकोत वाद
दे सलोख्याचे देणे
आनंदाने नांदू सगळे
मोरया हेच मागणे
आज इथे आल्याबद्दल
मंडळ आहे आभारी
नेहमी या,भेटत जा
आपलीच माणसं सारी
तर अस हे.....
सेंटलुईस आपल गाव
इथे राखू महाराष्ट्राचे नाव
आमच्या सगळ्या माणसांना
गणपतीबाप्पा तू पाव 🙏🏼
स्मिता चोपडे-खटावकर




स्मिता, तुझ्या लेखातून मंडळाची उबदार कहाणी छानपणे समोर आली. “आपले मंडळ, आपली माणसं” हे खरं किती जवळचं आहे, याची जाणीव झाली. वाचताना आपुलकी आणि अभिमान दोन्ही वाटले. 🙏 आपलेपण जपणारा हा प्रवास नक्कीच पुढच्या पिढ्यांनाही प्रेरणा देईल.